Headlines

अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण




गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी नोंदवलेले हे तापमान २०२० पासूनच्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे. यापूर्वी २०२२ आणि २०२५ मध्ये याच दिवशी (१३ एप्रिलला) तापमान ४३ अंश सेल्सिअस होते. हा अपवाद वगळता इतर कोणत्याही वर्षी या आकड्याला स्पर्श झाला नव्हता. वातावरणातील अनियमित बदलांमुळे उष्णतेच्या लाटांसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे जलविज्ञान केंद्रातील सूत्रांनी सांगितले. मार्चच्या उत्तरार्धानंतर अमरावतीचा पारा सातत्याने ४१-४२ अंश सेल्सिअसच्या पुढे राहिल्याने तीव्र उष्णतेची लाट आली आहे. यामुळे दुपारी मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असून, नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडताना नागरिक रुमाल, टोपी, छत्री आणि पाण्याची बाटली सोबत घेऊन जात आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उष्णतेसारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे ठोस उपाययोजना आखल्या जात असून, मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जात आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, आगामी आठवड्यात (१५ ते २० एप्रिल दरम्यान) विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होऊन तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहणे महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *