![]()
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि ‘खनिज जिहाद’ फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा ‘जिहाद’ थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ. तोगडिया सोमवारी अमरावतीत होते. त्यांनी या निमित्ताने दोन वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला. सकाळी एका हॉटेलमध्ये संवाद साधताना त्यांनी अमरावती जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील ‘जिहादी’ तयार होत असल्याचे म्हटले. याचा परिणाम म्हणून येथे ‘लव्ह जिहाद’, खनिजाची चोरी करून विल्हेवाट लावण्यासाठी ‘खनिज जिहाद’ आणि तरुण पिढीला बिघडवण्यासाठी ‘ड्रग्ज जिहाद’ घडवून आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या ‘जिहादा’ला कोण थांबवणार, असे विचारले असता, त्यांनी सरकार योग्य दिशेने पाऊल टाकत असल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या या उत्तराने अनेकांनाच बुचकळ्यात पाडले. या विषयाच्या खोलात जाण्यापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले. सरकार चांगले काम करत असले तरी यंत्रणा सर्वच कामे करू शकत नाहीत, असे त्यांचे मत होते. ते म्हणाले की, हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून आम्हीच सरकारला मदत करू आणि सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘जिहादीं’ना नमवू. दुपारी एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी पुन्हा माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया यांनी काही नवे मुद्दे मांडले. त्यांच्या मते, देशात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू झाल्यास प्रत्येक ठिकाणचे १०० लोक गृहीत धरल्यास एक कोटी लोक यानिमित्ताने एकत्रित होणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक असे सर्वच जण असतील. या सर्व हिंदूंच्या माध्यमातून ‘हिंदू प्रथम’ हा विचार रुजवून ‘जिहादीं’चा पत्ता साफ करण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया आणि आंतरराष्ट्रीय विहिंपचे महेश साहू आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सध्या अमरावतीत नऊ ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू असून, लवकरच ही संख्या शंभरावर नेली जाईल. या शहरात असे जाळे तयार झाल्यानंतर ‘हिंदू हेल्पलाईन’ सुरू केली जाईल. त्याआधारे आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, रोजगाराची उपलब्धता अशा बाबी पूर्णत्वास नेऊन समृद्ध, सुरक्षित व संपन्न हिंदू समाजाचे निर्माण केले जाईल, असेही डॉ. तोगडिया यांनी स्पष्ट केले.
Source link
अमरावतीत 'लव्ह, ड्रग्ज, खनिज जिहाद' फोफावला:डॉ. प्रवीण तोगडियांचा आरोप; सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही म्हटले