![]()
महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत. विशेष तपास पथक या सर्वच प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आज त्याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात होताच, न्यायाधीशांनी खरातला त्याचे नाव विचारले. त्यानंतर पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणाही केली. त्यावर खरातने हात जोडत नकार दर्शवला. खरातला उद्याही कोर्टापुढे हजर करणार यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. त्यावर कोर्टाने वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याची सूचना केली. त्यानुसार, आता वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा उद्या त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याही त्याला आजच्यासारखेच ऑनलाईन पद्धीतने कोर्टापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे. ईडीची नाशिक, पुणे, शिर्डीत छापेमारी दुसरीकडे, ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. नाशिकच्या तृप्ताबाला निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे. तिथे खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत ईडीचे अधिकारी पोहोचलेत. ते तिथे अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी करत आहेत. या खात्यांमधून तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. हे ही वाचा… प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांपुढे हजर:पतसंस्थेतील 2 कोटी 40 लाख रुपयांचा हिशोब देणार; प्रतिभा ह्या रुपाली चाकणकरांच्या भगिनी
भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांची बहीण असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला होता. अशोक खरातने जी खाती वापरली, त्या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचे मुलांच्या खात्यांचा सुद्धा समावेश होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी होणार आहे. वाचा सविस्तर
Source link