Headlines

आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश




महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, मोहिनी गायकवाड, विजय गोरे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अभियंते उपस्थित होते. महापौरांनी निर्देश देताना सांगितले की, मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच, उघडे ढापे बंद करून पथदिवे सुरळीत सुरू राहतील आणि मिरवणूक मार्गावर स्वच्छता राखली जाईल, याची खात्री करावी. सदर मिरवणूक क्रांती चौक – पैठण गेट – सिटी चौक – पोस्ट ऑफिस मार्गे भडकल गेटपर्यंत काढण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाची महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त पाहणी करून जयंतीच्या एक दिवस आधी सर्व अडथळे दूर करावेत, असेही त्यांनी नमूद केले. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. याशिवाय, दरवर्षीप्रमाणे भडकल गेट येथे स्टेज आणि पुतळ्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. विद्युत रोषणाई, म्युझिक सिस्टम आणि सुशोभीकरणाची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, असेही ते म्हणाले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी निर्देश दिले की, मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारे स्टेज दिलेल्या परवानगीनुसारच बांधलेले आहे का, याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी. नियोजित जागेपेक्षा अधिक जागा व्यापल्यास मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी मिरवणूक मार्गावर तसेच भडकल गेट येथे ॲम्बुलन्स व डॉक्टरांची व्यवस्था ठेवण्याची सूचना केली. आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेजची क्षमता आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *