![]()
प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे काम सुरू आहे. घरांवर रोषणाई, आकाश कंदील लावला आहे. जन्मोत्सव सोहळा आनंददायी करण्यासाठी शहरभर घरोघरी तयारी सुरू आहे. नवीन कपडे, सासरी गेलेल्या लेकीबाळी माहेरी उत्सवासाठी येत आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी असलेल्यांचे आगमन होत आहे. मंगळवारी पुरणपोळी, शिरा, असा गोड जेवणाचा बेत आहे . लाडू, करंजी, चकली, चिवडा करणे सुरू आहे. घरोघरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून लहान मुलांना गोड खाऊ दिला जातो. घरातील सदस्य बाबासाहेबांचे विचार मुलांना पटवून देतात. सायंकाळी महिला वर्ग एकत्र जमून बाबासाहेबांच्या विचारांचे आदान-प्रदान करतात. आठवणी, विचारांची शिकवण यांची उजळणी करतात. एकमेकींशी संवाद करतात. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही नवीन कपड्यांची खरेदी करतो. घराच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मुली माहेरी जयंतीसाठी आल्या आहेत. तयारी अंतिम टप्प्यात आहे. जयंतीला पुरणपोळीच्या जेवणाचा बेत असतो. सर्व नातेवाईक, मित्र एकत्र भोजनाचा आनंद घेतो अशी माहिती ताईबाई बनसोडे यांनी दिली. जयंती म्हणजे आनंदाची पर्वणी आहे, अशी माहिती बुधवार पेठेतील पौर्णिमा आबुटे यांनी दिली. डॉ. बाबासाहेबांची जयंती म्हणजे आनंदोत्सवच. घरात गोडधोड जेवण, चिवडा-लाडूचा फराळ. सफाई सुरू आहे. लेकीबाळी घरी येत आहेत. जावई, मुली यांच्यासाठी नवीन कपडे आहेर आणला जातो. जयंतीदिनी लहान मुलांना घरी बोलावून खीर, शिरा देतो. डॉ. बाबासाहेबांचे विचार पटवून देतो. महिलाही एकत्र येऊन बाबासाहेबांची पुस्तके वाचतात. प्रेमाने वागा, गरजूंना मदत करा, हाच संदेश असतो. सुनील आबुटे, बुधवार पेठेतील रहिवासी
Source link
आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट