![]()
राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ऑपरेशन टायगरच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत शिंदे हे आपले प्रयत्न यशस्वी करून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून संवाद साधला होता. त्या बैठकीत सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठावंत राहण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या या भेटीच्या वृत्तामुळे त्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीत ठाकरे गटातील आठ खासदार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, त्या रात्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात ही बैठक झाल्याचा दावा केला जात आहे. ही बैठक उशीरा रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते, असेही सांगितले जाते. या बैठकीला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते, अशी चर्चा आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आणखी दोन खासदार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाल्याचेही सांगितले जाते. या बैठकीत संबंधित खासदारांना शिंदे गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्व दाव्यांवर संबंधित खासदारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अशा कोणत्याही बैठकीची माहिती नसल्याचे सांगत, बैठक झाली असेल तर फोटो दाखवा, असे खुले आव्हान दिले. अरविंद सावंत यांनीही ठामपणे सांगितले की, काहीही झालं तरी मी शिंदे यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे निर्माण झालेला गोंधळ अधिकच वाढला असून, या प्रकरणात नेमके सत्य काय, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान ठाण्यात कथित गुप्त बैठक झाल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, या बैठकीत सहभागी असल्याचे सांगितल्या गेलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांनी आता या सर्व दाव्यांना ठामपणे नकार दिला आहे. एकामागोमाग एक खासदार पुढे येत आपली भूमिका स्पष्ट करत असल्याने या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार संजय जाधव परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी थेट भूमिका मांडली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे ठाण्यात झालेल्या कोणत्याही बैठकीशी माझा संबंध नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ते कोणत्याही बैठकीला गेले नाहीत आणि कोणाशीही संपर्क झालेला नाही. सध्या ते आपल्या कामात व्यस्त असून पक्षांतराचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. खासदार नागेश पाटील आष्टीकर याचप्रमाणे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही या कथित बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्रांकडून त्यांच्या नावाचाही या बैठकीत समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी या सर्व बातम्यांना स्पष्टपणे फेटाळले. अशी कोणतीही बैठक झाली आहे, याची मला माहितीच नाही. मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना आणखी धक्का बसला आहे. खासदार संजय देशमुख यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही अशाच प्रकारे या बैठकीत सहभाग नाकारला आहे. त्यांनी सांगितले की, मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणत्याही बैठकीत सहभागी झालो नाही. मला या बैठकीचे ना निमंत्रण होते, ना कुणी बोलावले. त्यामुळे अशा बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे या चर्चांची विश्वसनीयता आणखी कमी झाली आहे. राजकारण आणखी तापण्याची शक्यता या खासदारांच्या प्रतिक्रियांमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. एकीकडे गुप्त बैठकीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे संबंधित खासदारच या दाव्यांना नकार देत असल्याने नेमकं सत्य काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळासह जनतेचंही लक्ष लागले आहे.एकूणच, ठाकरे गटातील खासदारांनी एकमुखाने दिलेल्या इन्कारामुळे सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Source link
ऑपरेशन टायगर किती खरे – किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया