![]()
ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील त्यावेळेसच आपल्याला कळेल. कोणतेही ऑपरेशन करताना ते काही बँडबाजा लावून केले जात नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत जे रोज एकनाथ शिंदेंना सांगत असतात पण योग्य वेळी निर्णय घेणं ही शिंदेंची ख्याती आहे, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, या महिनाभरात तुम्हाला ऑपरेशल टायगर आहे की आणखी काही आहे हे महिनाभरात कळेल. आता सर्व काही शेवटच्या टप्प्यात आहे, तुम्हाला काही जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच उबाठामध्ये तुम्हाला स्फोट झालेला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलाताना शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे. शिंदेंसोबत जाणार नाही- सावंत अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहे. राऊत यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनाही फेटाळून लावत ठाकरे गटातील एकजूट अधोरेखित केली. आमचे नऊ खासदार एकत्र आहेत. काही नावं वाचून मला हसू आलं. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील, या प्रकारच्या बातम्या केवळ वातावरण तापवण्यासाठी किंवा काहीतरी घडत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत.
Source link
ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही:उबाठात लवकरच स्फोट होणार, आमदार, खासदार, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात- संजय शिरसाट