Headlines

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची




माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे कर्जमाफी कशी होणार याबाबत अधिकाऱ्यांनाही माहिती नाही, परिणामी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी दोन्ही सवलतींपासून वंचित राहत आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी डिफॉल्टर झाल्याने त्यांना ५० हजार रुपयांची नियमित सवलत मिळणार नाही. त्याचबरोबर, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, तेही कर्जमाफीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. याबाबत आपण सभागृहात तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे सत्तार यांनी सांगितले. कर्जमाफीच्या निकषांमध्ये पारदर्शकता असावी, तसेच शेतकऱ्यांना दीडपट कर्ज आणि फिरते भांडवल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सध्या शेतकरी उदासीन असून, त्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सत्तार यांनी पीक विम्याच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला असला तरी, त्यांना अद्याप पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांना वेळेत विम्याचे पैसे मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका जवळ येत असून, डिफॉल्टर झालेल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही, असे सत्तार यांनी नमूद केले. कर्जमाफी झाली तरी, शेतकऱ्यांना किमान दीडपट कर्ज उपलब्ध करून दिल्यासच त्यांना खरा फायदा होईल, अन्यथा त्यांच्या हाती काहीही येणार नाही, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *