![]()
हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात एका मद्यधुंद मोटार चालकाने किरकोळ वादातून खासगी बस चालकाला मोटारीखाली चिरडले. या धक्कादायक घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तानाजी शिर्के (वय ४१, रा. सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्के आणि सायकर हे खासगी बसवर चालक म्हणून काम करतात. रविवारी मध्यरात्री ते सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागातील महिलांना दोन बसमधून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घेऊन जाणार होते. रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावर कोईलवाडची मोटार आडवी आली. मोटार चालकाने बसला पुढे जाण्यास जागा दिली नाही, त्यामुळे सायकर यांनी कोईलवाडला विचारणा केली. बस रस्त्याच्या कडेला थांबवून सायकर यांनी मोटार चालक कोईलवाडला जाब विचारला. त्यावेळी तिथे अभिजित जमदाडे उपस्थित होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कोईलवाडने सायकर यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर मोटार नेली. मोटारीच्या धडकेने सायकर फरफटत गेले. त्यांनी मोटारीचे बोनेट पकडले होते, पण ब्रेक लावल्याने ते रस्त्यात पडले. या परिस्थितीत मोटार चालक कोईलवाडने कोणताही विचार न करता पुन्हा सायकर यांच्या अंगावर मोटार नेली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक एस. जाधव पुढील तपास करत आहेत.
Source link
किरकोळ वादातून खासगी बस चालकाला कारखाली चिरडले:हडपसर-सासवड रस्त्यावरील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल