Headlines

कोराडी वीज केंद्रात पुन्हा अपघात:बॉयलरमधून वाफ बाहेर पडल्याने 8 जण जखमी, तिघांना उपचारानंतर घरी सोडले




नागपूर येथील कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ४ मध्ये सोमवारी सकाळी एक अपघात घडला. बॉयलरमधून अचानक वाफ बाहेर पडल्याने एकूण आठ जण जखमी झाले. यामध्ये महानिर्मितीचे चार अधिकारी-कर्मचारी आणि चार कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संच बंद असताना सुमारे १३ मीटर उंचीवरील मजल्यावर ‘क्लिंकर’ काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी बॉयलरमधील पिप होलमधून अचानक वाफ बाहेर पडली, ज्यामुळे कामगारांना दुखापत झाली. या अपघातात सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनवणे, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलाबसिंग टिकाम, विलास बन्सोड आणि एन. के. काझी हे जखमी झाले. घटनेनंतर तात्काळ सर्व जखमींना नागपूर येथील मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सचिन भागेवार, तेजस सोनवणे आणि विलास बन्सोड यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, अधिकारी एन. के. काझी यांनाही सायंकाळपर्यंत सुटी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरवत आहे. उर्वरित चार जणांवर उपचार सुरू असून, महानिर्मिती अपघातातील कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. दरम्यान, या घटनेची सुरक्षा विभागाकडून सखोल चौकशी (सेफ्टी ऑडिट) सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, कोणत्याही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप आढळून आलेले नाही. गेल्या महिन्यातही वाफ गळतीमुळे चार कामगार जखमी दरम्यान, गेल्या महिन्यात देखील कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाफ गळती झाल्याने चार कामगार किरकोळ जखमी झाले होते. ही घटना केंद्राच्या टर्बाइन देखभाल विभागात घडली होती. ६६० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पात काम सुरू असताना गरम वाफ वाहून नेणाऱ्या नळीत अचानक गळती झाली. मोठ्या प्रमाणात गरम वाफ बाहेर पडल्याने जवळच काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हात आणि पायांवर वाफ गेली, ज्यामुळे त्यांना भाजले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *