![]()
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिवसेना नेत्यांनी पक्ष विस्ताराला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा रविवारपासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, हिकमत उढाण, संजना जाधव, रमेश बोरनारे, विलास भुमारे, प्रदीप जैस्वाल, संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, प्रकाश महाजन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना कशा पद्धतीने काम करत आहे, याचा आढावा घेण्यात आला. शेवटच्या स्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. शिवसेना राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावेत आणि महायुती सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यात पक्षाकडून वारंवार बैठका घेतल्या जातील, असेही ते म्हणाले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि पंचायत समितींमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला, तिथली कारणे शोधून कामात सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यापूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांचा तसेच मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. दरम्यान, बैठकीपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Source link
खासदार श्रीकांत शिंदेंचा ग्रामीण दौरा सुरू:छत्रपती संभाजीनगरमध्ये ३०० पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद