![]()
आदर्श गाव, स्मार्ट सिटी अशा कितीतरी महत्वाकांक्षी योजना शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्या असल्या तरी वास्तव काहीतरी वेगळेच आहे. दर्यापूर तालुक्यातील धामणा हे गाव याची साक्ष देते. शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या या गावाला स्वतंत्र रस्ता नाहीच, एका गावांतून नागरिकांनी कसातरी मार्ग काढला. मात्र हा दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे मरणयातना भोगण्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळे आम्हीही माणसं आहोत ना साहेब… म्हणत तेथील रहिवाशांनी त्याकडे यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. धामणा हे गाव धामोडी ग्रामपंचायतअंतर्गत येते. या गावाला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाही. त्यामुळे धामोडी ते तोंगलाबाद असे मार्गक्रमण करित तोंगलाबादवरुन आणखी दीड किलोमीटर पुढे जावे लागते. परंतु हे दीड किलोमीटरचे अंतर अक्षरश: तारेवरची कसरत करित पूर्ण करावे लागते. त्यामुळेच तंत्रज्ञानाने पुढे गेलेले लोकं म्हणतात पारधी समाजचे वास्तव्य असणारे धामणा गाव आजच्या एआय युगातही विकासापासून कोसो दूर आहे. या गावात साधारणत: ५० च्या आसपास घरे असून दीडशेवर लोकं राहतात. धामोडी ते तोंगलाबाद या दोन गावाच्या मधात नदीच्या किनारी हे लहानसे गाव आहे. तेथे पोहोचविणारा रस्ता पूर्णत: खडतर व खड्डेमय झाला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला बंगाली काट्या वाढल्या असल्याने येथील नागरिकांना प्रवास करणे जीवघेणा झाला आहे. गावच्या बाहेर किंवा दर्यापुर अथवा अकोला जाणाऱ्यासाठी त्यांना तोंगलाबाद गावातूनच जावे लागते. पण याच गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. प्रशासनाने रस्ता दुरुस्त करावा या परिसरात धामोडी, तोंगलाबाद येथील शेतकऱ्यांची जमीन असून त्या शेतकऱ्यांनासुद्धा रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान या रस्त्यावरील काट्या काढून संबंधित प्रशासनाने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा सर्व गावकरी तहसील कार्यालयावर उपोषण करतील. असा इशारा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व भारतीय आदिवासी पारधी विकास बहुउद्देशीय संघटनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पवार यांनी त्यामुळेच दिला आहे.
Source link
दीड किलोमीटर अंतराचा रस्ता जर्जर:धामोडीच्या पारधी बेड्यावरील नागरिकांचा रस्ते दुरुस्तीसाठी आर्त स्वर