![]()
कुर्डुवाडी ९ वर्षांच्या प्रशासकीय कालानंतर २०२५ मध्ये झालेल्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत (१३ नगरसेवक) आहे. शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य असून एक अपक्षही शिवसेना(उबाठा) गटाशी जोडला गेला. नगरपालिकेत विरोधी गटच नसल्याने सत्ताधारी गटांतच मानापमान नाट्य आणि खेकडी चाल सुरू झाली असून, यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली आहेत असा आरोप नागरिक करत आहेत. निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडे नगराध्यक्षसह सहा सदस्य (पाच सदस्य + एक अपक्ष), राष्ट्रवादीकडे १३ नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षपद शिवसेना गटाकडे गेल्याने दोन्ही पक्ष सत्ताधारी झाले. यामुळे सभागृहात विरोधकांचा अभाव असून, सत्ताधारी गटांतच एकमेकांना आव्हान देण्याची खेकडी चाल सुरू आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार दोन्ही पक्ष एकमेकांविना पुढे जाऊ शकत नाहीत, पण मानापमानाच्या निमित्ताने विषय हाणून पाडण्याचा प्रकार वाढला आहे . नागरिकांच्या हितांना धक्का आणि भीती थकीत मालमत्ता कर शास्ती माफीला सभागृहात मंजुरी मिळाली, कारण हा नागरिकहिताचा जिव्हाळ्याचा मुद्दा होता. मात्र राष्ट्रवादी आरोग्य सभापती मोहसीन मकणू यांच्या अखत्यारीतील न्यायालयीन आदेशित भटक्या श्वानांच्या नसबंदीचा विषय नामंजूर झाला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधाला विरोध म्हणून हा विषय पुढील सभेसाठी ढकलला. तसेच राष्ट्रवादी शिक्षण सभापती संजय टोणपे यांनी आरोग्य विभागाची जेटींग मशीन बाहेर पैसे कमावत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचेच सर्व सभापती असतानाही हे आरोप होत असल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे प्रकल्प रखडले असून शहराच्या धुळ मुक्तीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दुसऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य नगराध्यक्षांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असल्याचा आरोप शिवसेना गटातील स्वीकृत नगरसेवक धनंजय डिकोळे यांनी केला. नगराध्यक्षांनी न्यायालयीन आदेशाप्रमाणे भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफी हे दोनच विषय मांडले. राष्ट्रवादीने या विषयांपूर्वी आयत्यावेळीचा विषय म्हणून भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील एका रस्त्याला भगवान महावीर पथ नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. डिकोळे यांनी सदर समाजाने कोणालाही विश्वासात न घेता व गांधी यांच्या सांगण्यावरुन मिटींगलाही बोलावले नसल्याचा आरोप करून, आधी अध्यक्षांचे दोन विषय मंजूर करा, मग हा घेऊ अशी सूचना मांडली. यावरून सभागृहात जोरदार नाट्य घडले. या खेकडी चालीमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागातील मूलभूत कामे करता येत नाहीत. भटक्या कुत्र्यामुळे आरोग्य- सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले असून, रस्त्यांची अर्धवट कामे, पाण्याची कमतरता, कचरा संकलन व फवारणी यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. हे मानापमान नाट्य असेच चालू राहिले तर कुर्डुवाडी शहराला मोठे नुकसान होईल, अशी भीती आहे.
Source link
नगरपालिकेत मानापमान नाट्य अन् खेकडी चाल:कुर्डुवाडी नगरपालिका सत्ताधारी-विरोधकात वाद, त्यामुळे मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली