![]()
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पळसखेड शिवारात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात घुसून एका वासरावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकरी बाबराव पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांचे शेत गावाच्या हद्दीतच आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने गोठ्याजवळ प्रवेश केला आणि वासरावर हल्ला केला. सकाळी शेतात गेल्यावर वासराचा मृतदेह आढळला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. वासराच्या शरीरावर बिबट्याने ओरबाडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात मागील महिन्यातही अशीच घटना घडली होती. डॉ. ईश्वरकर यांच्या शेतातील वासरूही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले होते. त्यामुळे बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सततच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशीही मागणी पुढे आली आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनीही रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, लहान मुलांना आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे पळसखेड परिसरात दहशतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक झाले आहे.
Source link
पळसखेडमध्ये बिबट्याचा हल्ला, वासरू ठार:सलग दुसऱ्या हल्ल्याने शेतकरी भयभीत; वनविभागाकडे कारवाईची मागणी