Headlines

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू




पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या संवर्धनासाठी एकूण २१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. यापैकी कात्रज तलावातील गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे, मात्र पाषाण तलावासाठी आलेला निधी अजूनही पडून आहे. पाषाण तलावातील हजारो माशांच्या मृत्यूनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. तलावातील १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरीत्या कार्यरत नसल्याचे आढळून आले. यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते, ज्याचा जलचरांवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या संख्येने मासे व इतर जलचरांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून पाषाण तलावातील गाळ काढता येत नसल्याचे कारण दिले जाते, कारण तलाव कधीच रिकामा होत नाही. मात्र, या तलावात दररोज १५ एमएलडी सांडपाणी येत असल्याने तो नेहमीच पाण्याने भरलेला राहणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गाळ काढण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक होते, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह संपूर्ण प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळीच संवर्धन झाले असते तर तलावातील मासे आणि इतर जलचर वाचले असते, अशी खंत व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *