![]()
पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ ए प्रकल्पाचे सादरीकरण रविवारी कोथरुड येथील नागरिकांसमोर करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली असल्याचे प्रतिपादन केले. कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर आणि वारजे परिसराला जोडणाऱ्या या प्रस्तावित मेट्रो मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. स्थानिक नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी पुणे मेट्रोच्या वतीने हे सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पुणे मेट्रोचा विकास, सद्यस्थिती आणि प्रस्तावित लाईन ४ व ४ ए चे विस्तृत सादरीकरण केले. पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, तसेच कुटुंबासोबत योग्य वेळेची उपलब्धता वाढवण्यासाठी मेट्रोची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. हर्डीकर यांनी यावेळी प्रस्तावित मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण करण्याचा मेट्रोचा संकल्प असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी प्रकल्पाबाबत नागरिकांच्या शंकांचेही निरसन केले. चंद्रकांतदादा पाटील यांनी या सर्व सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त केले. २०१६ मध्ये पुण्यात मेट्रो प्रकल्प आला, तेव्हा तो अनेकांना दिवास्वप्न वाटत होता. मात्र, मेट्रोच्या वर्तमान स्थितीमुळे ती पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, मेट्रो ४ आणि ४ ए हा प्रकल्प पूर्ण झाल्यास कोथरुडकरांचा वेळ आणि पैसा वाचण्यासोबतच वाहतूक कोंडीतून सुटका होईल. पुण्यातील आयटीयन्ससाठी हिंजवडी मेट्रो मार्गिका देखील लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
पुणे मेट्रो लाईन 4, 4ए चे कोथरुडमध्ये सादरीकरण:चंद्रकांतदादा पाटील म्हणाले- मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग