Headlines

पुणे शहरातून एकाच वेळी दहा गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश; गुंडांवर गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे




पुणे शहर आणि जिल्ह्यातून गंभीर गुन्हे करणाऱ्या दहा गुंडांना तडीपार करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिले आहेत. गावठी दारू विक्री, जुगार आणि इतर गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये अभिजित संजय जाधव (वय २९), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २७), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६), गगन तानाजी शिंदे (वय २४), संकेत अमोल बांदल (वय २७), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८), सचिन भीमराव मातंग (वय २५), आदित्य बापू शिंदे (वय २५), बिरा रामदास श्रीराम (वय ३८) आणि मालती संतोष मलके (वय ४५) यांचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध चंदननगर, लोणीकंद आणि वाघोली पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुंडांना तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, ज्याला मंजुरी मिळाल्यानंतर उपायुक्त मुंडे यांनी हे आदेश दिले. पुणे पोलिसांच्या परिमंडळ सातमध्ये लोणीकंद, वाघोली, खराडी, चंदननगर, लोहगाव, विमानतळ आणि येरवडा ही पोलिस ठाणी येतात. गेल्या काही महिन्यांत पोलिसांनी या परिमंडळातून १०० गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. तडीपार केलेले गुंड शहरात दिसल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पुणे शहरातील धनकवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या एका गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, त्यानुसार गुंडाला यवतमाळ कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या गुंडाचे नाव रोहन राजेंद्र रोंगे (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आहे. रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी रोंगेविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे आणि उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंजुरी दिल्यानंतर रोंगेची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *