![]()
बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील या अंतर्गत वादाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी रात्रीच्या वेळी कवठळ गाव परिसरात गेले असताना, त्यांना तिथे दोन संशयित व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींना रात्रीच्या वेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. संबंधित संशयितांनी केलेल्या या हल्ल्यात संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोन्ही पोलिस कर्मचारी जखमी झाले. तामगाव पोलिसांवर हल्ला करणारे संशयित दुसरे कोणी नसून अकोला पोलिस दलात कार्यरत असलेले राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी संबंधित हल्लेखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस दलातीलच कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास सध्या गांभीर्याने सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करत आहेत. मात्र, अकोला पोलिस दलातील हे कर्मचारी रात्रीच्या वेळी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत नेमके कोणत्या कारणासाठी आले होते, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Source link
पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल