![]()
नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया यांनी चाकणकर कुटुंब आणि आरोपी अशोक खरात यांच्यातील कथित संपर्काची धक्कादायक आकडेवारीच सादर केली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण चार खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात प्रतिभा यांच्या नावे दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांमधून आतापर्यंत सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. याच संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी आज प्रतिभा चाकणकर यांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. यावरून आता अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील कॉल रेकॉर्ड्सचा ‘डाटा’ सादर केला. २१८ मेसेजेस कशासाठी? दमानियांचा रोकठोक सवाल प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आपला खरातशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, दमानिया यांनी १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतील कॉल रेकॉर्ड्सची माहिती सादर केली आहे. त्यानुसार प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात एकूण २३६ कॉल आणि मेसेज रेकॉर्ड्स समोर आले आहेत. यात आरोपी खरातने त्यांना १७ कॉल्स केले आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे २१८ मेसेजेस स्वतः प्रतिभा चाकणकर यांनी खरातला केले आहेत. तन्मय चाकणकरांचे खरातसोबत ३७ कॉल रेकॉर्ड प्रतिभा यांचा मुलगा तन्मय याचेही ३७ कॉल रेकॉर्ड्स आढळले आहेत. यात ११ कॉल्स तन्मयने खरातला केले, तर २० कॉल्स खरातने तन्मयला केले आहेत. यात ८ मेसेजेसचाही समावेश आहे. “जर खरातशी संबंध नव्हता आणि खाती बनावट होती, तर वर्षभरात हे शेकडो मेसेजेस आणि कॉल्स नक्की कशासाठी झाले?” असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. वकिलांच्या भूमिकेवरही कायदेशीर आक्षेप या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची बाजू मांडणाऱ्या वकील जयश्री काळे-पालवे यांच्यावरही दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. काळे-पालवे या ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या’ सदस्या आहेत. हे शासन नियुक्त ‘पूर्णवेळ’ सरकारी पद असल्याने त्यांना खासगी वकिली करण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे. असे असतानाही त्या चाकणकरांची वकिली कशी करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत, बहुदा राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठवले असेल, अशी शंका दमानिया यांनी उपस्थित केली.
Source link
प्रतिभा चाकणकरांनी खोटे बोलून हात झटकले:KYC केलेले खाते बनावट कसे असू शकते? दमानियांचा सवाल; कॉल रेकॉर्ड्सचा डाटा सादर