![]()
छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. त्या काळात जात, धर्म आणि लिंगभेदामुळे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. मात्र, फुले दांपत्याने या अन्यायाला आव्हान देत शिक्षणाचा मार्ग खुला केला. सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात मोलाचे योगदान दिले. डॉ. चंगोळे यांनी ‘महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान’ या विषयावर भाष्य केले. महात्मा फुले यांनी १८४८ साली स्त्रीशिक्षणाची पहिली शाळा सुरू करून समाजात क्रांतिकारी बदल घडवला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि संधी मिळावी, हा फुले यांच्या विचारांचा गाभा असून तो आजही अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वाचन, आकलन आणि आचरण केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत व्यक्त केले. हे विचार केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९५२ साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉज’ (LL.D.) ही मानद पदवी बहाल केली होती. या सन्मानपत्रात त्यांचा उल्लेख ‘एक महान समाजसुधारक, मानवाधिकारांचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि राष्ट्रनेते’ असा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, उपाधिष्ठाता डॉ. प्रभा खैरे, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. एम.बी. लिंगायत, डॉ. भारत सोनवणे, डॉ. राधेय खैत्री, डॉ. अनिल धुळे, डॉ. अविनाश लांब, मेट्रन सरोजिनी गायकवाड, यासह फुले-आंबेडकर जयंती समितीचे सदस्य उपस्थित होते.
Source link
फुले-आंबेडकरांचे मानवतावादी विचार आजही दिशादर्शक:विज्ञान-तंत्रज्ञान युगातही समतेचे मूल्य जपणे आवश्यक – डॉ. चंगोळे