Headlines

बलराज संघई यांचा कॉलम:शब्द भावनेचे वाहक अन् आधाराची सावली असतात




शब्द.. अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. दोन अक्षरांच्या एकत्र येण्याने काहीतरी उलगडा व्हावा अशी निर्मिती. नुसता आवाज आला तरी तो शब्द असतो. आणि आवाजाला काही अक्षरांचं स्वरूप असलं तर मात्र एक अर्थबोध होतो. म्हणूनच शब्द दोन प्रकारचे असतात ,अक्षरात्मक आणि अनक्षरात्मक. संपूर्ण जग दोन प्रकारच्या पदार्थांनी व्याप्त आहे. जीव आणि अजीव. जीव परस्पर व्यवहारासाठी शब्दांच्या माध्यमातून भाषेचा वापर करतात. तर दोन आजीवांचा परस्पर घर्षण अथवा वीखंडन अशा प्रकारचा संबंध आल्यास एक प्रकारचा ध्वनी निर्माण होतो तो ही शब्दच. तर आपण शब्दांच्या माध्यमातून भावना व्यक्त करतो. प्रत्येक शब्दाला काही ना काहीतरी भाव असतात अर्थ वा भाव नाहीत असा शब्दच नाही. ज्यामध्ये चैतन्य आहे त्याला आपण सजीव म्हणतो परंतु ज्यामध्ये चैतन्य नाही त्याला अजीव म्हणतो. चैतन्य हा जीवाचा प्रमुख गुण लक्षण. त्याचप्रमाणे चेतना नसणे हे लक्षण जीवांमध्ये दिसते. चेतना नसते परंतु स्पर्श, रस, गंध, वर्ण, रुप असे काही विशिष्ट गुण मात्र आजीवाचे प्रमुख लक्षण असतात. शब्द स्वर किंवा आवाज उत्पन्न व्हायचा असेल तर कोणत्यातरी दोन वस्तूंचा संबंध यावा लागतो. कंठ आणि हवा, दंत आणि जिव्हा. अथवा दोन अजीव जड पदार्थ एकमेकांवर घासणे,अलग होणे,आदळणे. जीव आजीवांच्या परस्पर संबंधाच्या निमित्त स्वरूपातून उत्पन्न स्वर, म्हणूनच त्यातून उत्पन्न झालेले स्वर ध्वनी अथवा शब्द मग ते अक्षरात्मक असोत अथवा अनक्षणात्मक; मात्र ते अजीव स्वरूपातच आहेत असे म्हणावे लागेल. शब्द ध्वनी लहरींच्या स्वरूपातून प्रवास करतात. ध्वनी लहरी या जर आपण भौतिक आणि अजीव स्वरूपाच्या असतील असे मानतो तर शब्द ही तसेच त्याच समान. सावली हा एक वेगळा विषय असला तरी संबंधित मात्र अजीवाशी आहे. सावली ही आजीव असते, तीही जड स्वरूप आहे. आता शब्दांची सावली याचा थोडासा विचार करावयाचा आहे. परंतु शब्द आणि सावली म्हटल्यावर भावना आलीच. कारण शब्द हे भावनेची वाहक असतात. भौतिक जगामध्ये शब्द आणि सावली हे भौतिक स्वरूपात अस्तित्वात आहेत. परंतु जिथे दोन जीवांचा संबंध येतो अथवा जीवाचा स्वतःशी संबंध येतो, तेथे शब्द हे भावनेचे स्वरूप घेऊन आलेले असतात तर सावली ही आश्रय,आधार शितलता या स्वरूपामध्ये व्यक्त झालेली असते. परंतु काही वेळा असं घडतं की शब्दांनीच सावलीचं स्वरूप धारण केलं. शब्द हेच आधार बनले. शब्दांच्याच आधाराने कोणीतरी जगतो आहे. कधीतरी कुठेतरी पडून, घडून, झडून गेलेले शब्द हेच एक मात्र त्या जीवाचा आधार असतात. अशावेळी शब्द हे सावलीचे स्वरूप धारण करतात. मग ते शब्द हीच सावली असेच म्हणावे लागते. शब्द जिरून जात नाहीत शब्द विरून जात नाहीत म्हणूनच शब्द हे स्मरण ठेवत असतात. आज आत्ता इथे बोललेला शब्द स्वर किंवा ध्वनी अथवा आवाज हा लहरींच्या माध्यमातून प्रवास करतो हे विज्ञानातून सिद्ध झालेले आहेच. पूर्वी कोणीतरी केव्हातरी बोललेले अथवा हृदयातून व्यक्त झालेले भावरूप शब्द माझ्याजवळ असू शकतात, तर काही मला छेदून भेदून व्यापून पुढेही गेलेले असतील आणि तेही कोणाच्यातरी जवळ असतील. तर मग कोणीतरी, केव्हातरी बोललेले शब्द अथवा त्याची असलेली आंतरिक अभिव्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विश्वामध्ये अस्तित्वात असते, नष्ट होत नाही हेही तितकेच खरे. भावना ही सुद्धा शब्दाचेच एक स्वरूप असते. मात्र ती अनक्षरात्मक अव्यक्त असते. म्हणून तिचेही शब्दा प्रमाणेच अस्तित्व कधीही नष्ट होत नाही त्यामुळेच शब्द आणि भावना दोन्हीही अस्तित्वात राहून कधी सुखावतात, आधाराची सावली देतात तर कधी दुखावतात आणि छळतात सुद्धा. प्रत्येकाच्या आठवणीत, साठवणीत आणि ठेवणीत काही शब्द असतात. जे कधीतरी, कुठून तरी, कोणाच्यातरी हृदयातून निघून कंठाच्या मार्गे मुख कमलातून प्रवास करून ओठांच्या माध्यमातून परत एकदा हृदयापर्यंत त्याच मार्गाने पोहोचलेले असतात. असेच जीव लावलेल्या जीवाचे अभिव्यक्त स्वरूप शब्द जीव लावणाऱ्या जीवाला एक जगण्यासाठी सावलीचा आधार झालेले मात्र नक्की असतात. मलाही अशाच काही शब्दांची सावली आहे. जी सावली माझा आधार आहे, ज्या सावलीमध्ये माझे जीवन शब्द श्वास स्वरूपात अस्तित्वात आहे. कोणीही न हिरावून घेणारी ही अखंड छाया शब्द स्वरूपातील सावली माझे एक शितल स्वरूप आवरण आहे. जसा निघालेला बाण परत येत नाही तसा निघालेला शब्दही परत घेता येत नसतो म्हणूनच ज्या हृदयातून शब्द निघाले आणि जी भावनेची अभिव्यक्ती आहे ती इच्छा असो अथवा नसो अस्तित्वात राहणारच यात शंका नाही म्हणूनच आजही माझ्यावरती आहे एक शब्दांची सावली. (संपर्कः 9420015108)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *