![]()
आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट फटका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिलमधील स्मारकाला बसला आहे. त्यानुसार हे काम येत्या डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता नाही. त्याला आणखी वर्षभर लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. वेळकाढूपणा अन् जनतेची दिशाभूल थांबवा विजय वडेट्टीवार सोमवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, महामानवांच्या विचारांप्रती सरकारची अनास्था. इंदू मिल येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आखाती युद्धाचे कारण पुढे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडणे दुर्दैवी आहे. देशातील इतर सर्व प्रकल्पांसाठी निधी आणि साहित्य मिळते, मग महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकालाच विलंब का? नोव्हेंबर 2026 पर्यंतची मुदतवाढ म्हणजे केवळ सरकारचा वेळकाढूपणा आहे. केवळ या एकाच प्रकल्पासाठी दिलेले तांबे आणि एलपीजी टंचाईचे कारण पटण्यासारखे नाही. कोट्यवधी अनुयायांच्या भावनांची ही थट्टा आहे. वेळकाढूपणा थांबवा, जनतेची दिशाभूल थांबवा, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या स्मारकाचे 95 टक्के काम पूर्ण इंदू मिलमधील प्रकल्पातील इमारतींचे सध्या 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. 350 फूट उंच पुतळा ज्यावर ठेवला जाणार आहे, त्या 100 फूट पादपीठाच्या (पेडस्टल) आरसीसीचे काम सुरू आहे. त्यावर पुतळ्याचा सांगाडा उभा केला जाईल. सांगाड्याचे काम दमण, भिलाई व नवी मुंबईत सुरू आहे. हा सांगाडा 6 हजार मे. टन असून, 4278 मे. टनाचे काम प्रकल्पस्थळी आले आहे. या सांगाड्यावर कांस्य धातूच्या पुतळ्याचे आवरण (स्कीन) असणार आहे. दादरमध्ये 300, तर इतरत्र 200 कर्मचारी या प्रकल्पावर काम करत आहेत. पुतळ्याच्या कांस्य धातूचे आवरण 850 मे. टनाचे असून, 100 मने. टन आवरण दादरमध्ये आले आहे. त्यात पुतळ्याच्या दोन बुटांचा समावेश आहे. धातू ओतकामाला वापरला जातो. पण युद्धामुळे तांबे व एलपीजीची देशात टंचाई निर्माण झाल्यामु्ळे या दोन्हीचे दरही वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटका पुतळ्याचे ओतकाम करणाऱ्या अनिल सुतार यांच्या कामास बसला आहे.
Source link
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार