![]()
पुण्यात ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आसामच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. बिहू नृत्याच्या वेगवान लय, तालबद्ध हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने पुणेकरांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली. हा कार्यक्रम भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू शिवाजीराव कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठकूर, असोमीचे राजीव बोरकटाटी आणि मौसमी बोरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रुमा रुलिका भुयान, हिमाश्री मेधी कलिता, अप्सरा गोगोई, निहारिका बोर्गोहैन, जाह्नोबी गोगोई आणि प्रियाक्षी कटक्य या पुरस्कारप्राप्त नृत्यांगनांनी बिहू नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. याशिवाय, पुण्यातील तन्वी गोखरे, आर्या घाटे आणि खानंडका यांनी त्रिपुरा राज्यातील होजगिरी लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आसाममधील सुप्रसिद्ध गायक निहारिका हजारिका, ध्रुव ठाकुरिया आणि रिपुंजीत यांनी आपल्या सुरेल आवाजाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांच्या सादरीकरणातून पारंपरिक आणि आधुनिक आसामी संगीताचा सुंदर संगम पुणेकरांना अनुभवता आला. यावेळी बोलताना प्रा. शारंगधर साठे यांनी सांगितले की, आसाम आणि महाराष्ट्राच्या परंपरा तसेच कला प्रकारांमध्ये अनेक साम्य आहेत. आसाममधील वैष्णव परंपरा आणि महाराष्ट्रातील परंपरा यामध्येही समानता आढळते. दोन्ही संस्कृतींमध्ये संवाद आणि आदानप्रदान वाढावे, या उद्देशाने दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Source link
बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या संस्कृतीची झलक:होजगिरी नृत्य, संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी सादर