![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासनाच्या प्रेरणेतून या अभियानाला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ असे नाव देण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. या शिबिरात जवळपास २० गावांचा समावेश असून, विविध विभागांच्या ४५ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शिबिराच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे ५ लाख कुटुंबांना लाभ मिळाला आहे. यामध्ये ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० हजार संगणकीकृत सातबारा वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रमाणपत्रांचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेतून प्रमाणपत्र वाटप आणि २ हजार कमी जास्त पत्रक तयार करण्यात आले. पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्यांचे वितरण झाले आहे. मंत्री बावनकुळे यांनी यावेळी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. पीएमआरडीए क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शेरे कमी करण्याबाबत पुनर्वसन मंत्री आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली जाईल. देवस्थानांच्या इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागामार्फत ड्रोन सर्वेक्षण करावे आणि मालमत्ता पत्रक व सनद देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी खासगी सर्व्हेअरची तातडीने नेमणूक करून मोजणी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असेही ते म्हणाले. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल.नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री बावनकुळे यांनी सूचना केली.
Source link
महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे समाधान शिबिराचे उद्घाटन:'विकसित भारत-2047' च्या संकल्पपूर्तीसाठी शासन प्रयत्नशील – बावनकुळे