Headlines

महाराष्ट्रातील बड्या नेत्याची VSR कंपनीच्या मालकाशी भेट:विमान प्रवासात अजितदादांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही सोबत




व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची विमानतळावर भेट घेतली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही उपस्थित होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका, व्ही के सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणे टाळा, अन्यथा सर्व काही अडचणीचे ठरेल, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात की घातपात? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणी उपरोक्त आरोप केला आहे. रोहित पवार शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हणाले, दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो, विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका… व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका.. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ / दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे प्रशासन संविधानानेच चालते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी थेट कर्नाटकात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेला झिरो एफआयआर नंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात वर्ग केला आहे. पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणीही संताप व्यक्त केला आहे. ते यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले होते, अनेक प्रयत्न करुनही अजितदादांच्या विमान अपघाताचा गुन्हा दुर्दैवाने महाराष्ट्रात दाखल होऊ शकला नाही, पण कोणताही वशिला न विचारता कर्नाटक पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा दाखल करुन महाराष्ट्राकडं वर्ग केला आणि कर्नाटकातील प्रशासन हे संविधान आणि नियमानुसारच चालतं, हेही यानिमित्ताने दाखवून दिलं. खुद्द अजितदादा उपमुख्यमंत्री असलेल्या गृहराज्यातील त्यांच्याच युतीचं सरकार असूनही दादांना न्याय मिळाला नाही पण कर्नाटकने मात्र त्यांना न्याय देण्याचं काम केलं. प्रशासनाकडून कसं काम करुन घ्यायचं हे त्या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री महोदयांवर अवलंबून असतं. त्यामुळं न्यायाच्या या लढाईत केलेल्या सहकार्याबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे आभार, असे ते म्हणालेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *