![]()
मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पावणेतीन तास थरार रंगला. वनविभागाने दोनदा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या नागरी वस्तीकडे धावल्याने आमदार चंद्रकांत पाटील व जमावाने लाठ्याकाठ्यांच्या साहाय्याने त्याला रोखून धरले. अखेर दुपारी १२.४० वाजता बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. पहाटे ४ वाजेपासून कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे कर्मचाऱ्यांना बिबट्याचा संशय होता. सकाळी १० वाजता शेतकऱ्यांना इमारतीमागे बिबट्या दिसल्यानंतर आमदार पाटील यांच्यासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रविवारी बाजार असल्याने खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला. सकाळी ११ वाजता वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जाळी लावून पहिले इंजेक्शन दिले, मात्र चवताळलेल्या बिबट्याने भिंतीवरून उडी मारून बसस्थानकात प्रवेश केला. या वेळी एका कर्मचाऱ्याला बिबट्याचे नख लागले. दुपारी १२.१० वाजता दुसरे इंजेक्शन दिल्यावरही तो पळत सुटला. अखेर ग्रामस्थ आणि वन विभागाच्या प्रयत्नांनी त्याला पकडण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. नागरी वस्तीत घुसला असता तर अनर्थ झाला असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची बाजू मांडताना म्हटले, ‘दोनदा इंजेक्शन देऊनही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता. तो नागरी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणून माझ्यासह जमावाने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला.’ सुरक्षित रेस्क्यू करता येत असेल तर मारणे चुकीचे वन्यजीव संरक्षण संस्थेचे (जळगाव) अध्यक्ष बाळकृष्ण देवरे म्हणाले, ‘बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन मारल्यानंतर आमदार आणि जमावाने हल्ला केल्याची चर्चा आहे. सुरक्षित रेस्क्यू करता येत असेल तर त्याला मारणे चुकीचे आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’
Source link
मुक्ताईनगरात बिबट्याला जमावाने लाठ्यांनी मारहाण करून पकडले:आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने लाठ्या मारल्या