Headlines

रात्रपाळीत झोपण्यावरून वाद:सुरक्षारक्षकाचा गमछाने गळा आवळून खून; खराडी पोलिसांकडून आरोपीला अटक




खराडी येथील एका सोसायटीच्या आवारात रात्रपाळीत झोपण्यावरून झालेल्या वादातून एका सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी एका सुरक्षारक्षक तरुणाला अटक केली आहे. पांडुरंग भाऊराव हरवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग हरवणे आणि सुदर्शन काळे हे खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी, शनिवारी, ते दोघे रात्रपाळीत कामावर होते. काळे हा आठ ते नऊ महिन्यांपासून सोसायटीत काम करत होता, तर हरवणे यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती आणि नुकतेच ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. रात्रपाळीत कामाची विभागणी करताना, रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत तीन तास झोप घेण्याचे दोघांमध्ये ठरले होते. मात्र, झोपायला पहिले कोण जाणार या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून काळे याने हरवणे यांच्या गळ्यातील गमछाने (डोक्याला गुंडाळण्याचे फडके) त्यांचा गळा आवळला. गळा आवळल्याने हरवणे बेशुद्ध पडले. त्यानंतर घाबरलेल्या काळेने तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्धावस्थेतील हरवणे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काळे याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास खराडी पोलिस करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *