![]()
महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीच्या नावाखाली अशी मागणी करण्यात येत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या बहाण्याने एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपी रमेश चव्हाण याने योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेचे घर गाठले आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. या धक्कादायक मागणीमुळे हादरून गेलेल्या महिलेने अजिबात वेळ न घालवता थेट पोलिस ठाणे गाठले आणि या विकृत प्रवृत्तीविरुद्ध तक्रार नोंदवली. विनयभंगाचा गुन्हा दाखल या प्रकरणाच्या तपासादरम्यान चव्हाण याने अन्य एका महिलेशीही गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. त्याने निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या या आरोपीविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय कामाच्या बहाण्याने घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून मोठी खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसेंची अदिती तटकरेंवर टीका या घटनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय अदिती तटकरे स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाई, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले. आता मतदान मिळाल्यानंतर मात्र योजनेसाठी विविध अटी, शर्ती लावल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. लवकरात लवकर योग्य कारवाई करा ही के-वायसी करत असताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठे बँक खात्याची अडचण येत आहे, कुठे मोबाइल नंबरची, काही महिलांचे तर सर्व कागदपत्रांची जुळवणी झाली असताना त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. यामुळे महिलांची प्रचंड धावपळ होत आहे. यात काही राक्षसी वृत्तीचे लोक डाव साधतात. यात तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
Source link
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जळगावात धक्कादायक प्रकार:नराधमाकडून E-KYC साठी शरीरसुखाची मागणी; महाराष्ट्रात खळबळ