![]()
सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’ अशा प्रकारचे बनावट मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. याला प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक होऊन बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची शक्यता असते. गेल्या काही महिन्यांपासून असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून असे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मेसेज पाठवले जात नाहीत. या प्रकरणी सायबर सेलमध्ये यापूर्वीही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे महावितरणने म्हटले आहे. महावितरण केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टिमद्वारे अधिकृत माहिती पाठवते. यात पूर्वनियोजित देखभाल, दुरुस्ती किंवा तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन, रीडिंगची तारीख, वापरलेली युनिट संख्या, देय दिनांक आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटीसचा समावेश असतो. या अधिकृत मेसेजचा सेंडर आयडी ‘एमएसईडीसीएल’ (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा असतो आणि त्यात कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात नाही. ग्राहकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये, बिलाच्या पेमेंटसाठी कोणतीही लिंक किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका किंवा तक्रारी असल्यास, वीजग्राहकांनी २४ तास उपलब्ध असलेल्या १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे मेसेज आल्यास cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.
Source link
वीजग्राहकांना बनावट मेसेज, सायबर भामट्यांकडून फसवणूक:वीजपुरवठा खंडित होण्याच्या धमक्या; महावितरणचे दुर्लक्ष करण्याचे आवाहन