Headlines

शरद मोहोळ खून प्रकरण:वकील आरोपी संजय उधाणचा जामीन फेटाळला; आरोपींना मदत केल्याचे आढळले पुरावे




पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कांगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार करणारे साहिल पोळेकर, नामदेव कांगुडे आणि चंद्रकांत शेलके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली. तसेच, सहआरोपींना सिम कार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ नवीन सिम कार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राईम ब्रांचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाबाबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असे ॲड. राजपूत आणि सोलंकी यांनी जामीनाला विरोध करताना सांगितले. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, संजय उधाण हे व्यवसायाने वकील असून आरोपी त्यांचे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क केवळ व्यावसायिक स्वरूपाचा होता. तसेच, सहआरोपी रवी पवार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समानतेच्या तत्त्वावर त्यांनाही जामीन द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावताना नमूद केले की, रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती आणि त्यांचा थेट शूटरांशी संपर्क नव्हता. उलट, संजय उधाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, त्यांच्या हालचालींचे समन्वय करणे आणि आत्मसमर्पणाबाबत प्रयत्न करणे यावरून त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. न्यायालयाने ‘कायदेशीर सल्ला’ या बचावालाही नाकारले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *