![]()
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठा दावा समोर आला आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेतली, तरच दादासाहेब खिंडकर यांना कारागृहातून सोडू,” असा प्रस्ताव धनंजय देशमुख यांना देण्यात आल्याचा दावा १३ महिन्यांच्या कारावासानंतर बाहेर पडलेले दादासाहेब खिंडकर यांनी केला होता. आता खिंडकर यांच्या दाव्याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आले होते, असा खुलासा धनंजय देशमुख यांनी केलाय. धनंजय देशमुख यांच्या दाव्यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय देशमुख, दादासाहेब खिंडकर आणि भाजप आमदार सुरेश धस, यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावात वाढलेल्या चोऱ्या, घरफोडी आणि इतर सुरक्षेच्या प्रश्नांवर या बैठकीत तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी गेल्या चार महिन्यांपासून दडलेले हे गुपित उघड करत, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यासंबंधी केलेल्या दाव्याला बळकटी देणारे वक्तव्य केले आहे. नेमके काय म्हणाले धनंजय देशमुख? धनंजय देशमुख म्हणाले, डिसेंबर महिन्यात ती घटना घडली होती. संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलवून घेतले होते. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटले होते. मला ज्या ठिकाणी यायचे आहे त्या ठिकाणी मी येईल मात्र ज्या ठिकाणी तुम्ही बोलवाल त्या ठिकाणी येण्यास मी तयार नाही, त्यामुळे तिथे मी गेलो नाही. मी पोलिस अधीक्षकांना देखील याविषयी सांगितले होते. माझी बदनामी, खच्चीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहे आणि लढत राहीन. दादासाहेब खिंडकर यांचा दावा काय? १३ महिन्यांच्या कारावासानंतर बाहेर पडलेले दादासाहेब खिंडकर यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना खिंडकर म्हणाले, “आम्हाला ज्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, त्यातून बाहेर काढण्यासाठी धनंजय देशमुख यांच्यावर दबाव टाकला जात होता. ‘जर दादा खिंडकरला बाहेर काढायचे असेल, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तक्रार मागे घ्या,’ अशी अट घालण्यात आली होती.” या दाव्यामुळे या हत्याकांडामागील सूत्रधारांकडून आजही तपासावर दबाव आणला जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण ९ डिसेंबर २०२४ रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याचे नाव समोर आले होते. या हत्याकांडाचे भीषण फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाच्या राजकीय पडसादानंतर अखेर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Source link
संतोष देशमुख हत्या प्रकरण:धनंजय देशमुखांचे दादा खिंडकरच्या दाव्याला बळकटी देणारे विधान, चार महिन्यापूर्वीचे गुपीत फोडले