![]()
शिर्डीतील साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या 2022 मधील मृत्यू प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. राहाता न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे कारण देत अशोक खरात यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या भूमिकेचा पुन्हा सखोल तपास होणार आहे. मृत व्यक्तीचे नाव विकास रामदास दिवटे (वय 37, रा. शिर्डी) असे आहे. त्यांनी 9 जून 2022 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले होते. या घटनेनंतर त्यांच्या भावाने, राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विकास दिवटे यांना कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. तक्रारीनुसार, सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून विकास यांना पत्नी आणि मुलाशी संपर्क साधण्यास अडथळे आणले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या तणावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तिघांसह अशोक खरात यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही अशोक खरात यांचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले होते. मीरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्याकडे विकास यांना नेण्यात आले होते. तेथेही त्यांना त्रास देण्यात आला आणि धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे विकास दिवटे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता. पोलिस पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणार तथापि, तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे सांगत पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अशोक खरात यांचे नाव वगळले होते. या निर्णयावर आक्षेप घेत पुन्हा तपास करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहाता न्यायालयाने ही मागणी मान्य करत प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व बाबींचा नव्याने आढावा घेतला जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिस पुन्हा एकदा या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. विशेषतः अशोक खरात यांचा या घटनेत नेमका काय सहभाग होता, याचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या तपासामुळे प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Source link
साई संस्थान कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट:चार्जशीटमधून नाव वगळलं, तरी अशोक खरात पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात