Headlines

सिग्नलशी छेडछाड करून 'सह्याद्री एक्सप्रेस'वर दरोडा:प्रवाशांचे दागिने अन् मोबाईल लंपास, कराडच्या शेणोली स्थानकाजवळील घटना




कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर प्रवाशांचे दागिने व मोबाईल लंपास केले. याप्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील शेणोली स्थानकाजवळ आली होती. यावेळी चोरट्यांनी रेल्वेच्या आऊटर सिग्नलवर लाल कापड टाकून तो बंद पाडला. तांत्रिक बिघाडामुळे सिग्नल ‘लाल’ झाल्याचे समजून रेल्वे चालकाने गाडी आऊटरलाच थांबवली. गाडी थांबताच अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या ४ चोरट्यांनी डब्यांच्या खिडकीतून हात घालून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली. प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण या लुटीमध्ये मिरज येथील रहिवासी मीना विकास उमापती आणि त्यांच्या सहप्रवासी आशा नारायण पवार यांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरट्यांनी खिडकीतून हात घालून जबरदस्तीने खेचून नेल्या. तसेच रंजन दयानिधी साहू या प्रवाशाचा मोबाईलही चोरट्यांनी हिसकावून घेतला. काही प्रवाशांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सर्वांना गप्प केले आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मिरज पोलिसांत गुन्हा दाखल घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, सोलापूरचे रवींद्र गायकवाड आणि मिरज लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. या घटनेमुळे सह्याद्री एक्सप्रेस बराच वेळ घटनास्थळी उभी होती, त्यानंतर ती पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. याप्रकरणी मीना विकास उमापती (रा. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मिरज रेल्वे पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक फौजदार मुर्ढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी थेट छेडछाड करून अशा प्रकारे रेल्वे लुटल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः आऊटर सिग्नलवर रेल्वे थांबते तेव्हा प्रवाशांच्या संरक्षणासाठी कोणती खबरदारी घेतली जाते, याबाबत आता संताप व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *