Headlines

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. दैवी आवाज शांत झाला – एकनाथ शिंदे दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशाताईंच्या निधनामुळे चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *