![]()
पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरणे, गुन्हेगारांची माहिती व पूर्वेतिहास पडताळून कारवाई करण्याचे काम केले जाते. त्यासाठी सीसीटीएनएस प्रणाली महत्वाची मानली जाते. हिंगोली जिल्ह्याचे कामकाज अधिक दर्जेदार व उत्कृष्ट व्हावे यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांची नियुक्ती केली आहे. या शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम केले जाते. यासाठी जिल्हास्तरावर जमादार राजू हमाने, राहुल तडकसे, पूजा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून १३ पोलिस ठाण्याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवले जाते. या सोबतच पोलिस ठाण्यांना येणाऱ्या अडचणीची सोडवणूक केली जाते. दरम्यान, राज्यात पोलिस दलाच्या ५३ घटनांमधून या प्रणालीचा आढावा घेत त्यांना गुण देण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात पहिला क्रमांक मिळविला आहे. सीसीटीएनएस विभागाच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी सीसीटीएनएस विभागाचे अभिनंदन केले आहे.
Source link
हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण