![]()
गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित २८ वा कलाश्री संगीत महोत्सव नुकताच पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात दिमाखात संपन्न झाला. घराणेदार गायक कलाकारांच्या मैफलीने या महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाच्या उद्घाटनाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, संतपिठाचे संचालक राजू महाराज ढोरे, बासरीवादक दीपक भानुसे, गायक पं. रघुनाथ खंडाळकर आणि वास्तू उद्योजक अजित घुले आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या तिन्ही दिवसांची सुरुवात राधानंद व कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने झाली. पहिल्या दिवशी युवा शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे शास्त्रीय गायन रंगले. अभयसिंह यांनी राग पुरिया धनश्री सादर केला. यात त्यांनी विलंबित एक तालात ‘अब तो ऋतु मान आये…’ ही बंदिश आणि ‘पायलिया झनकार मोरी…’ हा छोटा ख्याल गायला. त्यांच्या ‘याद पियां की आयें…’ या लोकप्रिय ठुमरीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अभयसिंह वाघचौरे यांना हरिभाऊ असतकर यांनी संवादिनी, चेतन ताम्हणकर यांनी तबलासाथ दिली, तर आयुष सोनावणे, रवी पांचाळ आणि ईशान भंडारी यांनी तानपुरा व गायनसाथ केली. यानंतर कृष्णा साळुंखे यांच्या पखवाजवादनाने महोत्सवाचा माहोल बदलला. त्यांनी राग आदिताल निवडत प्रस्ताराने वादनाला सुरुवात केली. शिवपरण सादर करत त्यांनी एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. काही रेले आणि विविध जती या तांत्रिक व लयकारीच्या प्रकारांच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाला विराम दिला. साळुंखे यांना यशवंत थिट्टे यांनी संवादिनीसाथ केली. २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायनाने झाला. अंकिता यांनी राग दरबारी कानडा आणि राग हंसध्वनी गायले. राग दरबारी कानडामध्ये त्यांनी ताल झपतालात ‘असी दरबारी गुणीजन गावे…’ ही रचना, त्यानंतर तीनतालात ‘बनवारी बनायके गए…’ आणि एकतालातील ‘मान जा मोरे पिया…’ या रचना सादर केल्या. यानंतर राग हंसध्वनीमध्ये अंकिता यांनी ‘पवन पूत हनुमान लला…’ ही रचना गायली. ‘नाम गाऊ…’ या अभंगाने त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. अंकिता यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), भाग्यश्री टोमके, तेजल कोठावळे, मानसी महाजन यांनी तानपुरासाथ केली.
Source link
28 वा कलाश्री संगीत महोत्सव उत्साहात पडला पार:पिंपळेगुरव येथे घराणेदार गायकांच्या मैफलीने समारोप