![]()
आदर्श जीवनाची सुरुवात म्हणजे बालवयात होणारे संस्कार होय, असे प्रतिपादन हभप भागवताचार्य सूरज महाराज पोहोकार यांनी केले. नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कुलमध्ये सुरु असलेल्या बालसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या वेळी शिबिराचे संचालक हभप उमेश महाराज जाधव, शिबिराचे उपमुख्याध्यापक भूषण महाराज गिरी, शिबिर शिक्षक कार्तिक महाराज चवात, विशाल महाराज मलगे, गोपाल काकडे, पवन ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आपले विचार अधिक पुढे नेताना भागवताचार्य सूरज महाराज पोहोकार म्हणाले, कुणाच्याही आदर्श जीवनाची सुरुवात ही बालवयापासूनच होते. आपल्या विचाराचा ठसा उमटवण्याकरता व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये अथक परिश्रम करावे लागतात. या परिश्रमाकरिता योग्य वेळ ही बाल अवस्था असते. ज्याप्रमाणे ओल्या मातीला आकार दिला असता, त्यातून मडके घडवल्या जाते, तसेच बालवयामध्ये ज्या विचारांचे बिजारोपण केले जाते ते विचार आयुष्यभर माणसाच्या सोबत राहतात आणि त्या विचारांतूनच आदर्श जीवनाची सुरुवात होते.त्यामुळेच विद्यार्थ्याच्या बालवयावर संस्कार होणे हे गरजेचे आहे. ही संस्काराची गरज ओळखता वारकरी संप्रदायातील संतांची विचार गाथा, ज्ञानेश्वरी, गीता व भागवत याचे संस्कार जीवनामध्ये होणे गरजेचे आहे. हे संस्कार मिळवण्याचे ठिकाण म्हणजे बालसंस्कार शिबिर आहे. या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थी घडवले जातात व भारतीय संस्कृतीचे आणि आपल्या मूल्यांचे जतन केल्या जाते. नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूल येथे गेल्या सतत १२ वर्षांपासून हे शिबिर भरवले जाते. येथे विद्यार्थी घडवण्याचे काम सातत्याने होत आहे. यामध्ये संत विचार, वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती, हरिपाठ, काकडा आदींसारखे विषय विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता दिले जातात आणि या अभ्यासातूनच एक आदर्श जीवनही निर्माण होते.
Source link
आदर्श जीवनाची सुरुवात बालवयात होणारे संस्कारापासून होते- पोहोकार:बारा वर्षांपासून सलग आयोजन; वारकरी परंपरा, हरिपाठाचे धडे