- Marathi News
- National
- Future Of Language Sanskrit Is The Spoken Language Of 26 Thousand Villagers In 3 Villages In Rajasthan
अतुल सिंह | अजमेर18 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

संस्कृत भारतीने शिबिरे घेऊन भाषा शिकवली.नंतर आपापसात बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले.
- ग्राहक- सेबफलस्य मूल्यं किम्?
- फळ विक्रेता- एकस्य सेबफलस्य मूल्यं पञ्च रुप्यकाणि.
- ग्राहक- किं स्वल्पं न्यूनं कर्तुं शक्नोति?
- फळ विक्रेता – आम्, भवतः कृते चत्वारि रुप्यकाणि भविष्यन्ति.
हे संभाषण वाचून आश्चर्य वाटू शकते. पण राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील ८ हजार लोकवस्तीच्या सावरचे ४८०० ग्रामस्थ संस्कृतमध्ये संवाद साधतात. बुंदी जिल्ह्यातील कापरेनचे १४,००० व बांसवाडाच्या गनोडाचे ७००० ग्रामस्थ संस्कृतमध्ये बोलतात. या तिन्ही गावांत संस्कृत हळूहळू दैनंदिन जीवनाचा भाग बनली. येथे मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे संस्कृत बोलतात.पण हे एका दिवसात घडले नाही. ’संस्कृत भारती’ नावाची संस्था १९९६ पासून येथे संस्कृत शिकवण्याचे काम करते.
लहानांपासून वृद्धांपर्यंत अशी शिबिरे घेऊन भाषा शिकवली
संस्कृत भारतीचे प्रांत कार्यालय प्रमुख भूपेंद्र सिंह म्हणाले, आम्ही विविध वयोगटासाठी संस्कृत शिबिरे घेतली. यामध्ये तीन प्रकारचे वर्ग होते- १५ दिवसांचा निवासी वर्ग, ७ दिवसांचा हिवाळी वर्ग व १० दिवसांचे सायंकाळचे शिबीर. निवासी शिबिरांमध्ये संस्कृतचे शिक्षक तयार केले जात असत. हे शिक्षक मग गावागावांत जाऊन ग्रामस्थांना व्यावहारिक संस्कृत शिकवत. सुरुवातीला दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे शब्द व नंतर पूर्ण वाक्ये बोलायला शिकवले जात.
कर्नाटकचे मत्तुर आणि मध्य प्रदेशचे झीरी गावही संस्कृतमय
संस्कृत भारतीचे महानगर शिक्षण प्रमुख हिंमत सिंह चौहान म्हणाले, राजस्थानच्या या तीन गावांआधी कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मत्तुर आणि मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील झीरी ग्रामस्थही आपापसात संस्कृतमध्ये बोलतात. विशेष म्हणजे या गावांमध्ये संस्कृत केवळ सुशिक्षित वर्गापुरती मर्यादित नाही, तर सामान्य काम करणारे ग्रामस्थ व सफाई कामगारही समाजात वावरताना संस्कृतमध्ये संवाद साधतात.
संस्कृत ग्राम बनले सावर, कापरेन आणि गनोडा
संस्कृत भारतीचे चित्तौड प्रांताचे कार्यालय प्रमुख भूपेंद्र सिंह म्हणाले, गनोडा गावात १०० टक्के ग्रामस्थ संस्कृत बोलतात, तर कापरेनमध्ये सुमारे ७० टक्के व सावरमध्ये ६० टक्के लोक संस्कृतमध्ये बोलतात. १९९६ मध्ये आम्ही ही गावे निवडून तिथे शिबिरे घेतली. कारण येथे आधीपासूनच संस्कृत शिक्षण विभागाच्या शाळा सुरू होत्या. सुरुवातीला शिक्षक, मग विद्यार्थी आणि शेवटी सामान्य ग्रामस्थांना संस्कृत बोलण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे, येथे संस्कृत ही संस्कृत माध्यमातूनच शिकवली गेली. ती इतर ठिकाणी सहसा हिंदी माध्यमातून शिकवली जाते.
तीन गावांत संस्कृत विद्यालये, प्रत्येक घरांत संस्कृतचे जाणकार
गावातील गल्लीबोळात संस्कृत बोलणे ही सामान्य गोष्ट झाली . जवळपास प्रत्येक घरात संस्कृत जाणणारी व्यक्ती आहे. कारण गावातील प्राचीन संस्कृत शाळा व संस्कृत भारतीची नियमित शिबिरे. मी स्वतः इंग्रजीचा शिक्षक आहे, पण आता संस्कृत बोलण्यात, लिहिण्यात आणि शिकवण्यात पारंगत झालो आहे.
-डॉ. प्रदीप भट्ट, प्राचार्य, संस्कृत विद्यालय.