Headlines

इंदापूरमध्ये जय भवानी सोसायटीच्या सचिवला लाच घेताना अटक:नवीन पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारली




पुणे, प्रतिनिधी: इंदापूर येथील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव नाना चंद्रकांत बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. नवीन पीक कर्ज मंजूर केल्याच्या मोबदल्यात त्याने एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात करण्यात आली. नाना चंद्रकांत बोराटे (वय 43, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सचिवाचे नाव आहे. या प्रकरणी एका 34 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती असून, त्यांनी 24 मार्च 2026 रोजी जिल्हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज भरले होते. त्यानंतर तक्रारदाराने पंधारवाडी येथील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत पुणे जिल्हा बँकेकडे नवीन पीक कर्जासाठी प्रस्ताव सादर केला होता. या सहकारी सोसायटीत बोराटे सचिव म्हणून कार्यरत आहे. 7 एप्रिल रोजी तक्रारदार बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेटले. त्यावेळी बोराटेने त्यांना 2 लाख 76 हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाल्याचे सांगत, त्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याला लाच देणे मान्य नसल्याने, त्याने 8 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर, 9 एप्रिल रोजी बोराटेला पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *