![]()
शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. इतिहासाशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी महासंघाने दिल
.
शालेय पुस्तकांत मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत आणि स्पष्ट स्वरूपात द्यावा. डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड) नकाशाची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाद्वारे समजणे आवश्यक असताना तो वगळणे ही अस्मितेशी तडजोड आहे, अशी भावना महासंघाने व्यक्त केली.
शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिला. या प्रसंगी शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे, वैभव चव्हाण यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.