![]()
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण अधिकारी असावरी काळे यांनी तातडीने प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेपर उपलब्ध करून घेतले. या पेपरचे शुक्रवारी तारीख 10 केंद्रामध्ये वाटप करण्यात आले आहे औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला बुधवारी तारीख 9 आग लागून या घटनेत सुमारे १२ हजार मराठी, इंग्रजी व गणित विषयांचे पेपर पूर्णतः जळून खाक झाले होते. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शिक्षण अधिकारी असावरी काळे, औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत कार्यरत गटशिक्षण अधिकारी शेख तोफिक यांनी तातडीने पावले उचलत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे नवीन प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदवली. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत संबंधित परिषदेकडून आवश्यक ते सर्व पेपर उपलब्ध करून देण्यात आले. शुक्रवार, ता १० रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हे नवीन प्रश्नपत्र संच औंढा नागनाथ येथील गटसाधन केंद्रात दाखल झाले. पेपर प्राप्त होताच शिक्षण विभागाने तत्काळ हालचाली सुरू करत वितरणाची प्रक्रिया हाती घेतली. आज सकाळी ११ वाजता शिक्षणाधिकारी आसावरी काळे व गटशिक्षण अधिकारी शेख तोफिक यांच्या मार्गदर्शनाखाली गटसाधन केंद्रातील कर्मचारी पांडुरंग सूर्यवंशी, मनोज कांबळे, शिवशंकर गुडमे, शिवाजी टोम्पे आणि राहुल थडगे यांनी उर्वरित सहा केंद्रांच्या केंद्रप्रमुखांना संकलित मूल्यमापन चाचणीचे पेपर नियोजनबद्ध पद्धतीने वाटप केले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे चाचणी वेळेत आणि सुरळीत पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेची कारणे शोधण्यासाठी संबंधित स्तरावर चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Source link
औंढा नागनाथ येथे १२ हजार पेपर पुन्हा मिळाले:मूल्यमापन चाचणीचा मार्ग मोकळा, शिक्षणाधिकारी असावरी काळे यांचा पाठपुरावा