Headlines

तांदुळवाडी जि. प. शाळेत चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर:जिल्हा परिषद शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया, शिक्षण विस्तार अधिकारी देवरे‎



राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या

.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक संस्था आहेत. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या यशोगाथेवर प्रकाश टाकला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे सांगत, त्यांनी पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वर्षभरात विविध उपक्रमांत चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले. पुणे येथील उद्योजक शंकर मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्हे उपलब्ध करून दिल्याबद्दल, युवा उद्योजक ऋषिकेश मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, लावणी आणि कोळीगीतांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

या सोहळ्याला माजी मुख्याध्यापिका वंदना कांडेकर, प्रभूजी बाचकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, माजी अध्यक्ष भास्कर पेरणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, निसार सय्यद, शिवाजी खडके, स्वाती धसाळ, अश्विनी चव्हाण, विक्रम पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, अशोक तोडमल, रेवन्नाथ खडके यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका संगीता बेदरे आणि शिक्षक रमेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *