![]()
अमरावती येथे आयोजित प्रा. साहेबराव विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला. धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. पाटणकर म्हणाले की, कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते, ज्यामुळे अनेकदा शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणग्रस्तांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात, अनेकजण विस्थापित होतात, मात्र त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळेच त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्याच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. पाटणकर यांनी नमूद केले. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले की, आज संधी प्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगिकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले की, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला, तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एकप्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे, असेही वानखडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले.
Source link
धरणाचे पाणी कोरवाहू शेतकऱ्यांना का देत नाही?:प्रा. साहेबराव विधळे गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर यांचा सवाल