![]()
नाशिक येथील आयटी कंपनीत कार्यरत तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजपने शुक्रवारी या प्रकरणी सदर कंपनीवर मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. महिला नोकरदारांनी तक्रार केल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी या प्रकरणी भाजपने केली आहे. नाशकातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला नोकरदारांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 गुन्हे दाखल करत 6 संशयितांना अटक केली आहे. मागील 4 वर्षांपासून हा प्रकार घडत होता. पण त्याकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले होते. अखेर ही बाब उजेडात आल्यानंतर सत्ताधारी भाजपने या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. आज भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रवीण मोरे, मनपा गटनेते श्याम बडोदे आदींच्या नेतृत्वात कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी थेट कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांना रोखले. पण त्यानंतर भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाला कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी आत सोडण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप केले. भाजपचे कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप ते म्हणाले, कंपनीत घडलेली घटना अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे. ही बाब संस्थेच्याच नव्हे, तर महिलांच्या सुरक्षिततेला व सन्मानला धक्का पोहोचवणारी आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. कंपनीत शिस्त व नियंत्रणाचा पूर्णतः अभाव दिसून येतो. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागते. कंपनी परिसरात कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन दिसून येते. त्यामुळे कंपनीत सध्या कार्यरत असलेल्या व नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे अनिवार्य करण्यात यावे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण व धर्मांतराच्या तक्रारींची स्वतंत्र व सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विशेषतः कंपनी परिसरात गैरवर्तन करणारे व सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा तातडीने कार्यान्वित करम्यात यावी. या प्रकरणी 2 दिवसांत योग्य ती कारवाई झाली नाही, तर भाजप पुन्हा कंपनीवर धडक देईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
Source link
नाशिकच्या IT कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण:भाजपने काढला कंपनीवर मोर्चा, आंदोलकांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी