Headlines

पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम




पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. गोपाल, कदम, डॉ.गणेश जोगदंड, मारोती पोले यांच्यासह स्थानिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “पोलिओ निर्मूलनामध्ये भारताने मिळवलेले यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या ५ वर्षांखालील बालकाला पोलिओ डोस देणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी जागरुक राहून पाल्यांना पोलिओ डोस द्यावा. राज्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. त्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्यात ज्या ठिकाणी बालके केंद्रावर येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी गृहभेटीद्वारे डोस दिला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत डोर टू डोअर जाऊन लाभार्थी बालकांना पोलिओ डोस दिला जाईल. त्याबाबत नियोजन देखील आरोग्य विभागाने केले असून शहरी व ग्रामीण भागातील नियोजनानुसार काम करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यावेळी हिंगोली जिल्हयातील नियोजनाची माहिती डॉ. शेळके यांनी दिली. कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले. गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा सज्ज असून पावसाळ्यात साथ रोग पसरू नये याची काळजी गावकऱ्यांनी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी गावकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *