Headlines

प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख खंडणी उकळली:पोलिस उपनिरीक्षक, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघांवर गुन्हा दाखल




पुण्यात एका धक्कादायक घटनेत, प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील ‘रील स्टार’ सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. अजित बडे सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपींनी संगनमत करून एका शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला लक्ष्य केले. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 7 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या प्राचार्याने ही रक्कम आरोपींना दिली.

हा प्रकार खंडणीखोरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्राचार्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी सोनाली हिंगे सोशल मीडियावर ‘रील स्टार’ म्हणून लोकप्रिय आहे. पोलिस गणवेशातील तिचे रिल्स मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात नाव आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आणि पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *