Headlines

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले – त्यांनी सामंजस्यपणा दाखवला




बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली. सध्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम होती. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला असून, बारामतीची निवडणूक आता ‘बिनविरोध’ होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. सुनील तटकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, “बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे. अजित पवार यांनी १९९१ आणि १९९२ मध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तसेच १९९९ ते २०१४ या काळात लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहून महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेसने दाखवलेल्या या सामंजस्याचे मी बारामतीच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो.” दिल्लीतून सुटला माघारीचा ‘टॅब’ यावेळी सुनील तटकरे यांनी यावेळी एक महत्त्वाची माहिती दिली की, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः त्यांनी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला होता. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या या चर्चेनंतरच माघारीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, “साहेबांची भूमिका लोकशाही मूल्यांना धरून होती. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. परंतु, जशी नाशिकच्या पोटनिवडणुकीत राजकीय परिपक्वता पाहायला मिळाली होती, तशीच आता बारामतीतही दिसत आहे.” काँग्रेससोबतच्या वादावर पडदा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत (NDA) हातमिळवणी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिले. “आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि ही भूमिका आम्ही उघडपणे मांडली आहे. सपकाळ यांचे राजकारणातील ज्ञान मोठे आहे, आम्हीही अनेक वर्षे काँग्रेससोबत काम केले आहे. आजच्या घडीला त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे सांगत तटकरेंनी वादावर पडदा टाकला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *