Headlines

बार्शीटाकळी येथे नागरी वस्तीमधून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त:राज्य अन्न आयोग सदस्या व पुरवठा विभागाचा छापा‎




शहरातील इंदिरा आवास भागात गुरुवारी प्रशासनाने एक मोठी कारवाई करत नागरी वस्तीत साठवलेले सुमारे ८०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. राज्य अन्न आयोगाच्या सदस्य आणि तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा छापा टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गु्प्त माहितीवरून प्रशासनाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी बार्शीटाकळी येथील इंदिरा आवास भागात अवैध इंधन साठा असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य अन्न आयोग सदस्या माया प्रदीप ईरतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या पथकाने तातडीने छापा टाकला. या पथकात बार्शिटाकळीचे निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता (पथक प्रमुख), पुरवठा निरीक्षक नासीरखान, कनिष्ठ लिपिक भूषण भोडणे, तसेच महादेव लुले आणि राजू शिरसाट यांचा समावेश होता. पथकाने इंदिरा आवास येथील सय्यद फैजान सय्यद निसार यांच्या मालकीच्या टिनपत्र्याच्या गोदामावर छापा टाकला. झडती घेतली असता, तेथे २०० लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक टाक्यांमध्ये अंदाजे ८०० लिटर डिझेल सदृश द्रव पदार्थ आढळून आला. यासोबतच १० लिटरची एक प्लास्टिक कॅन ज्यात पेट्रोल सदृश पदार्थ होता, तोही जप्त करण्यात आला. तसेच, इंधनाची अवैध विक्री आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे २०० लिटरचे ४रिकामे प्लास्टिक ड्रम, ५६ रिकाम्या प्लास्टिक कॅन्स, दीड हॉर्स पॉवरची एक मोटर पंप आणि पाईपचे बंडल असा मुद्देमाल प्रशासनाने हस्तगत केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. राज्य अन्न आयोग सदस्य माया ईरतकर यांनी संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी सय्यद फैजान याच्याविरुद्ध ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दाट नागरी वस्ती असलेल्या इंदिरा आवास भागात अत्यंत ज्वलनशील असलेल्या डिझेलचा एवढा मोठा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत घातक आहे. एखादी छोटीशी ठिणगीसुद्धा येथे मोठी आग लावून भीषण जीवित व वित्तहानी घडवू शकली असती. या गोरखधंद्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता. टंचाई काळात अवैध साठा सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत आहे. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यात ८०० लिटरचा अवैध साठा मिळून येणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. प्रशासनाने तालुक्यात सुरू असलेल्या अशा अवैध पेट्रोल-डिझेल विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *