![]()
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते. पहाटेचा वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कामसू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या अकाली जाण्याने महसूल विभागाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
Source link
भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू:लातूर-अंबाजोगाई मार्गावर दुर्घटना; तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ