![]()
नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या नव्या प्रकरणामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली असून तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात जमीन व्यवहाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करताना मंदिर उभारण्याचा बहाणा केला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्यांनी शेतजमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचे उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर, फार्महाऊस, आंब्याची बाग आणि इतर मालमत्ता या व्यवहारात समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी विरोध केल्यास जादूटोणा करून नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 16.50 एकर जमीन केवळ 15 लाख रुपयांत विकत घेतल्याची नोंद असून या व्यवहाराची चौकशी आता सखोलपणे केली जाणार आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज केला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हाही दाखल आहे. फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे खरातचे नवे कारनामे उघड होत आहेत. भाविकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. स्वस्त वस्तू महागात विकणे, बनावट साधनांचा वापर करून भीती निर्माण करणे अशा प्रकारांमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयात पुढील सुनावणीत काय घडते आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा उघड; चौदावा गुन्हा दाखल:शेतकऱ्यांची लूट, जमीन व्यवहारात मोठी फसवणूक